नावात काय आहे?
---------------------------***----------------
स्वत:ची छोटीशी कंपनी चालू करताना तिला काय नाव द्यावे, तिचे बोधचिन्ह काय असावे यावर देखील बराच काथ्याकूट केला जातो. त्यात किंवा नावामध्ये कधी उद्योजकाला स्वत:चे नाव गुंफावेसे वाटते तर काहींना शहराचे नाव! काहींना व्यवसायाचे नाव द्यावेसे वाटते, तर काहींना आपल्या उत्पादनाची वैशिष्टय़े. आज आपण बघणार आहोत अशाच काही रंजक कथा; ज्यायोगे एखाद्या कंपनीचे नाव किंवा बोधचिन्ह तयार करताना कोणत्या विचारांची सांगड घातली गेली होती याचा उलगडा आपल्याला होईल.
नोकिया कंपनीचा मालक, फ्रेडरिक, आधी दोन पल्प मिल्सचा मालक होता. त्याची दुसरी पल्प कंपनी नोकिया शहरात होती. फिनलंड येथील ‘नोकिया’ शहरातून या कंपनीची वाटचाल पल्पपासून मोबाइलपर्यंत झाली म्हणून कंपनीला हे नाव देण्यात आले. एमआरएफ टायर्स भारतातील एक मशहूर ब्रॅण्ड. इतका की सध्याच्या आघाडीच्या क्रिकेटपटूच्या, विराटच्या बॅटवर तो विराजमान आहे. एमआरएफ म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी; म्हणजे इथे ही स्थान माहात्म्य आलेच की. ‘सॅनजोस’ हे सिस्को कंपनीचे हेडक्वार्टर आहे. सॅनजोसजवळच असलेल्या सॅनफ्रॅस्किस्को नावाच्या शहरातील ‘सिस्को’ शब्द वापरून कंपनीचे नाव ठेवण्यात आले.
डय़ुरेक्स हे गर्भनिरोधक क्षेत्रामधील एक नावाजलेले नाव. डय़ुअर (DUREX) या शब्दामधून कंपनीला आपले उत्पादन वैशिष्टय़ ग्राहकांना सांगावेसे वाटले. डय़ुरेबल (Durable -DU) म्हणजे टिकाऊ, रिलाएबल (reliable -RE) म्हणजे विश्वसनीय व एक्सलन्स (excellence -EX) म्हणजे सर्वोत्तम परफॉर्मन्स, या तीन वैशिष्टय़ांना त्यांना कंपनीच्या नावातून ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे होते. आपले उत्पादन विश्वसनीय व इतरांचे असेलच याची खात्री देता येत नाही हे लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी डय़ुरेक्स (durex)ची एक मजेदार जाहिरात आहे. जे ग्राहक आमच्या प्रतिस्पर्धी कंपनीची उत्पादने वापरतात, त्यांना आंतरराष्ट्रीय पितृदिनाच्या शुभेच्छा!
मर्सिडीज कंपनीचा ट्रायस्टार लोगो डोळ्यासमोर आणा. आपल्या कंपनीचे प्रभुत्व आकाश, सागर व धरतीवर आहे हे दर्शविणारा तो लोगो आहे. सध्या मर्सिडीज व बीएमडब्ल्यू या दोन कंपनींचे जाहिरात युद्ध चालू आहे. नुकतेच बीएमडब्ल्यू कंपनीने कार उद्योगात आपले शंभर वर्षांचे योगदान पूर्ण केले आहे. आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीचे अभिनंदन करतानादेखील आपणच कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे दर्शविण्यासाठी मर्सिडीज कंपनीने भन्नाट जाहिरात दिली होती. आमच्यासोबत शंभर वर्षांची सुदृढ स्पर्धा केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण पहिली तीस वर्षे स्पर्धाच नसल्याने जरा कंटाळवाणी गेली. या जाहिरातीमधून आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त, म्हणजे १३० वर्षांची परंपरा आहे, हा चिमटा मर्सिडीजने बीएमडब्ल्यूला काढला. थोडक्यात काय तर फक्त कंपनीचे नाव किंवा बोधचिन्ह उत्तम असून चालत नाही ते ग्राहकांच्या मनावर वारंवार ठसविण्यासाठी कल्पक जाहिरातींची पण गरज असते.
फोक्सव्हॅगन (Volkswagen) जर्मन कार कंपनी आहे. या कंपनीच्या नावाचा किंवा बोधचिन्हाचा संबंध थेट हिटलरशी आहे. ज्या उद्देशाने भारतामध्ये मारुती कारची मुहूर्तमेढ रोवली गेली अगदी त्या कारणासाठीच या कंपनीची स्थापना जर्मनीमध्ये झाली होती. हिटलरपूर्व काळात महागडय़ा कारसाठीच जर्मनी मशहूर होती. हिटलरला म्हणूनच सामान्य लोकांसाठी चार सीटर स्वस्त गाडी असावी असे वाटत होते. फोक्सव्हॅगन (Volkswagen) चा जर्मन भाषेत अर्थ होतो, पीपल्स कार म्हणजे सामान्य लोकांची गाडी.
अॅमेझॉन कंपनीचे सीइओ, जेफ बेजोस यांनी जेव्हा कंपनी काढली तेव्हा त्यांना आपल्या कंपनीचे नाव ‘ए’ अक्षरापासून हवे होते. अॅमेझॉन जगातील सर्वात मोठी नदी असल्याने आपली कंपनीदेखील भविष्यात अशीच विशाल व्हावी या अपेक्षेने त्यांनी हे नाव सुचविले. व्यवस्थापनाने कंपनीच्या बोधचिन्हामध्ये ‘ए’ पासून ‘झेड्’पर्यंत जाणारा बाण दाखविला आहे. यातून त्यांना अभिप्रेत काय आहे की या कंपनीच्या माध्यमातून जगातील सर्व वस्तू प्राप्त करता येऊ शकतील.
‘गुगल’ म्हणजे एकचा शंभरावा घात; म्हणजेच एक वर शंभर शून्ये असलेली संख्या. ही संख्या अपरिमित संधींचे किंवा माहितीचे प्रतीक असू शकते या विचाराने लेरी व सर्जी या द्वयीने आपल्या नवीन कंपनीचे नाव ठेवले ‘गुगल’. या सर्च इंजिनमुळे खरोखरच अपरिमित ज्ञानभांडार मानवजातीला उपलब्ध झाले आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे काही तरुण उद्योजकांना आपल्या नावाचे अप्रूप असल्याने, त्यांनी कंपनीच्या बोधचिन्हामध्ये त्याचा बेमालूमपणे वापर केला. ‘एचपी’ (HP) म्हणजे ह्य़ुलेट पॅकर्ड (Hewlett Packard) ही कंपनी दोघा मित्रांनी चालू केली; नावे होती डेव्हिड पॅकर्ड व विल्यम ह्य़ुलेट. कोणाचे नाव आधी यावे यासाठी दोघा मित्रांनी नाणे उडविले. त्यात ठरले की विल्यमचे नाव प्रथम येईल व डेव्हिडचे दुसरे. त्यामुळे कंपनीचे नाव ठरले, ‘एचपी’.
‘डीएचएल’ कंपनीमध्येदेखील तिघा भागीदारांची नावे लपलेली आहेत. ती नावे आहेत- अॅड्रिन डेल्से, लॅरी हिलब्लूम आणि रॉबर्ट लिन.
तर कधी कधी कंपनीचा लोगो किंवा नाव याचा, मालक किंवा उत्पादनाशी दुरान्वयेदेखील संबंध नसतो. उदाहरण द्यायचे झाल्यास पेप्सीचे देता येतील. पेप्सीचा संबंध आहे ‘पेप्सीन’ (pepsin) या ‘एन्झाईम’शी. पण या शीतपेयाचा या एन्झाईमशी काडीमात्र संबंध नाही.
याउलट काही कंपन्यांच्या बोधचिन्हामध्ये ती कंपनी कोणत्या व्यवसायात आहे हे सरळ सध्या भाषेत सुचविलेले असते. व्होडाफोन (Vodafone) या मोबाइल कंपनीचा संबंध आवाज व्हॉईस (Voice), माहिती/ डेटा (Data) व दूरध्वनी (Telephone) शी आहे हे तिच्या नावातूनच कळून येते.
मायक्रोसॉफ्ट (Microsoft) म्हणजे मायक्रो (micro) कॉम्प्युटर व सॉफ्टवेअर (software) या दोन व्यवसायांचे प्रतिनिधित्व करते.
शेक्सपियरने ‘नावात काय आहे?’ म्हटले असले तरीदेखील या सुरस कथा आपल्या आजूबाजूला आपण अनुभवत आहोतच की!