It's me

It's me
No caption

Saturday, 2 September 2017


नावात काय आहे?
---------------------------***----------------
स्वत:ची छोटीशी कंपनी चालू करताना तिला काय नाव द्यावे, तिचे बोधचिन्ह काय असावे यावर देखील बराच काथ्याकूट केला जातो. त्यात किंवा नावामध्ये कधी उद्योजकाला स्वत:चे नाव गुंफावेसे वाटते तर काहींना शहराचे नाव! काहींना व्यवसायाचे नाव द्यावेसे वाटते, तर काहींना आपल्या उत्पादनाची वैशिष्टय़े. आज आपण बघणार आहोत अशाच काही रंजक कथा; ज्यायोगे एखाद्या कंपनीचे नाव किंवा बोधचिन्ह तयार करताना कोणत्या विचारांची सांगड घातली गेली होती याचा उलगडा आपल्याला होईल.

नोकिया कंपनीचा मालक, फ्रेडरिक, आधी दोन पल्प मिल्सचा मालक होता. त्याची दुसरी पल्प कंपनी नोकिया शहरात होती. फिनलंड येथील ‘नोकिया’ शहरातून या कंपनीची वाटचाल पल्पपासून मोबाइलपर्यंत झाली म्हणून कंपनीला हे नाव देण्यात आले. एमआरएफ टायर्स भारतातील एक मशहूर ब्रॅण्ड. इतका की सध्याच्या आघाडीच्या क्रिकेटपटूच्या, विराटच्या बॅटवर तो विराजमान आहे. एमआरएफ म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी; म्हणजे इथे ही स्थान माहात्म्य आलेच की. ‘सॅनजोस’ हे सिस्को कंपनीचे हेडक्वार्टर आहे. सॅनजोसजवळच असलेल्या सॅनफ्रॅस्किस्को नावाच्या शहरातील ‘सिस्को’ शब्द वापरून कंपनीचे नाव ठेवण्यात आले.

डय़ुरेक्स हे गर्भनिरोधक क्षेत्रामधील एक नावाजलेले नाव. डय़ुअर (DUREX) या शब्दामधून कंपनीला आपले उत्पादन वैशिष्टय़ ग्राहकांना सांगावेसे वाटले. डय़ुरेबल (Durable -DU) म्हणजे टिकाऊ, रिलाएबल (reliable -RE) म्हणजे विश्वसनीय व एक्सलन्स (excellence -EX) म्हणजे सर्वोत्तम परफॉर्मन्स, या तीन वैशिष्टय़ांना त्यांना कंपनीच्या नावातून ग्राहकांपर्यंत पोहोचवायचे होते. आपले उत्पादन विश्वसनीय व इतरांचे असेलच याची खात्री देता येत नाही हे लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी डय़ुरेक्स (durex)ची एक मजेदार जाहिरात आहे. जे ग्राहक आमच्या प्रतिस्पर्धी कंपनीची उत्पादने वापरतात, त्यांना आंतरराष्ट्रीय पितृदिनाच्या शुभेच्छा!

मर्सिडीज कंपनीचा ट्रायस्टार लोगो डोळ्यासमोर आणा. आपल्या कंपनीचे प्रभुत्व आकाश, सागर व धरतीवर आहे हे दर्शविणारा तो लोगो आहे. सध्या मर्सिडीज व बीएमडब्ल्यू या दोन कंपनींचे जाहिरात युद्ध चालू आहे. नुकतेच बीएमडब्ल्यू कंपनीने कार उद्योगात आपले शंभर वर्षांचे योगदान पूर्ण केले आहे. आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीचे अभिनंदन करतानादेखील आपणच कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे दर्शविण्यासाठी मर्सिडीज कंपनीने भन्नाट जाहिरात दिली होती. आमच्यासोबत शंभर वर्षांची सुदृढ स्पर्धा केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. पण पहिली तीस वर्षे स्पर्धाच नसल्याने जरा कंटाळवाणी गेली. या जाहिरातीमधून आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त, म्हणजे १३० वर्षांची परंपरा आहे, हा चिमटा मर्सिडीजने बीएमडब्ल्यूला काढला. थोडक्यात काय तर फक्त कंपनीचे नाव किंवा बोधचिन्ह उत्तम असून चालत नाही ते ग्राहकांच्या मनावर वारंवार ठसविण्यासाठी कल्पक जाहिरातींची पण गरज असते.

फोक्सव्हॅगन (Volkswagen) जर्मन कार कंपनी आहे. या कंपनीच्या नावाचा किंवा बोधचिन्हाचा संबंध थेट हिटलरशी आहे. ज्या उद्देशाने भारतामध्ये मारुती कारची मुहूर्तमेढ रोवली गेली अगदी त्या कारणासाठीच या कंपनीची स्थापना जर्मनीमध्ये झाली होती. हिटलरपूर्व काळात महागडय़ा कारसाठीच जर्मनी मशहूर होती. हिटलरला म्हणूनच सामान्य लोकांसाठी चार सीटर स्वस्त गाडी असावी असे वाटत होते. फोक्सव्हॅगन (Volkswagen) चा जर्मन भाषेत अर्थ होतो, पीपल्स कार म्हणजे सामान्य लोकांची गाडी.

अ‍ॅमेझॉन कंपनीचे सीइओ, जेफ बेजोस यांनी जेव्हा कंपनी काढली तेव्हा त्यांना आपल्या कंपनीचे नाव ‘ए’ अक्षरापासून हवे होते. अ‍ॅमेझॉन जगातील सर्वात मोठी नदी असल्याने आपली कंपनीदेखील भविष्यात अशीच विशाल व्हावी या अपेक्षेने त्यांनी हे नाव सुचविले. व्यवस्थापनाने कंपनीच्या बोधचिन्हामध्ये ‘ए’ पासून ‘झेड्’पर्यंत जाणारा बाण दाखविला आहे. यातून त्यांना अभिप्रेत काय आहे की या कंपनीच्या माध्यमातून जगातील सर्व वस्तू प्राप्त करता येऊ शकतील.
‘गुगल’ म्हणजे एकचा शंभरावा घात; म्हणजेच एक वर शंभर शून्ये असलेली संख्या. ही संख्या अपरिमित संधींचे किंवा माहितीचे प्रतीक असू शकते या विचाराने लेरी व सर्जी या द्वयीने आपल्या नवीन कंपनीचे नाव ठेवले ‘गुगल’. या सर्च इंजिनमुळे खरोखरच अपरिमित ज्ञानभांडार मानवजातीला उपलब्ध झाले आहे.

आधी म्हटल्याप्रमाणे काही तरुण उद्योजकांना आपल्या नावाचे अप्रूप असल्याने, त्यांनी कंपनीच्या बोधचिन्हामध्ये त्याचा बेमालूमपणे वापर केला. ‘एचपी’ (HP) म्हणजे ह्य़ुलेट पॅकर्ड (Hewlett Packard) ही कंपनी दोघा मित्रांनी चालू केली; नावे होती डेव्हिड पॅकर्ड व विल्यम ह्य़ुलेट. कोणाचे नाव आधी यावे यासाठी दोघा मित्रांनी नाणे उडविले. त्यात ठरले की विल्यमचे नाव प्रथम येईल व डेव्हिडचे दुसरे. त्यामुळे कंपनीचे नाव ठरले, ‘एचपी’.

‘डीएचएल’ कंपनीमध्येदेखील तिघा भागीदारांची नावे लपलेली आहेत. ती नावे आहेत- अ‍ॅड्रिन डेल्से, लॅरी हिलब्लूम आणि रॉबर्ट लिन.

तर कधी कधी कंपनीचा लोगो किंवा नाव याचा, मालक किंवा उत्पादनाशी दुरान्वयेदेखील संबंध नसतो. उदाहरण द्यायचे झाल्यास पेप्सीचे देता येतील. पेप्सीचा संबंध आहे ‘पेप्सीन’ (pepsin) या ‘एन्झाईम’शी. पण या शीतपेयाचा या एन्झाईमशी काडीमात्र संबंध नाही.

याउलट काही कंपन्यांच्या बोधचिन्हामध्ये ती कंपनी कोणत्या व्यवसायात आहे हे सरळ सध्या भाषेत सुचविलेले असते. व्होडाफोन (Vodafone) या मोबाइल कंपनीचा संबंध आवाज व्हॉईस (Voice), माहिती/ डेटा (Data) व दूरध्वनी (Telephone) शी आहे हे तिच्या नावातूनच कळून येते.
मायक्रोसॉफ्ट (Microsoft) म्हणजे मायक्रो (micro) कॉम्प्युटर व सॉफ्टवेअर (software) या दोन व्यवसायांचे प्रतिनिधित्व करते.

शेक्सपियरने ‘नावात काय आहे?’ म्हटले असले तरीदेखील या सुरस कथा आपल्या आजूबाजूला आपण अनुभवत आहोतच की!

Thursday, 10 August 2017


सध्या शिकत असलेल्या किंवा नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आयबीएम सारख्या कंपनीत दीर्घकाळ काम करून भारतात परतलेले ख्यातनाम तज्ञ डॉ.भूषण केळकर यांचे मार्गदर्शन
-------------------------------------------------
** सध्या शिकत असलेल्या आणि येत्या २-३ वर्षांत इंजिनिअर होणाºया मुलांना तुम्ही काय सांगाल?
- जे खरंच आता मनापासून शिकत आहेत आणि पुढच्या २-३ वर्षांत इंजिनिअर म्हणून बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी येत्या काळात भरपूर संधी असणार आहेत. तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत वेगानं पोहचतंय. थ्रीजी-फोरजी तर आता आहेतच, पण इंटरनेटच्या वेगाबरोबर त्यांच्या वापरकर्त्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशांतर्गत डिजिटल मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. फक्त यासाठी योग्य मार्ग वेळीच निवडायला हवा. केवळ कोडिंग, टेस्टिंग डोक्यात असेल तर मी तर म्हणेन आत्ताच जागे व्हा. नाहीतर खूप अवघड आहे. सध्याचा विचार करता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी यात भविष्यात चांगल्या संधी आहेत. अमेरिकेत सायबर सिक्युरिटी विषयात असणाºया तज्ज्ञांची संख्या एक लाखावर आहे. लोकसंख्येत भारत अमेरिकेच्या जवळपास चौपट आहे आणि आपल्या देशात हीच तज्ज्ञांची संख्या दोन वर्षांपूर्वी आठ हजार इतकी होती. येत्या काळात आधारकार्ड नियमित उपयोगात येईल. आता जीएसटी वापरात आला आहे. तंत्रज्ञानावर आधारित विकासाचे अनेक प्रकल्प येऊ घातलेत आणि या सगळ्यात आपल्याला तज्ज्ञांची गरज आहे. केवळ आजचा विचार न करता उद्याच्या बदलांचा अंदाज घेऊन आजच त्या दृष्टीने कामाला लागा.
** इंजिनिअर तर झालो पण नोकरी नाही अशी अनेकांची अवस्था आज दिसते, त्यांनी कसा विचार करायला हवा..
- शिक्षण झालंय आणि नोकरी चालू आहे किंवा नोकरीचा शोध चालू आहे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा काळ आहे. आपली आवड लक्षात घेऊन लगेचच त्यांनी निर्णय घ्यायला हवा. त्यांना आहे त्यातच पुढे जायचं असेल तर नवे कोर्स शिकण्याला पर्याय नाही. पण त्याशिवाय खरंतर संधी खूप आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यादृष्टीने लगेच सुरुवात करायला हवी. विशेषत: विश्लेषण (अ‍ॅनालिसिस), व्यवस्थापन (मॅनेजमेण्ट), माध्यम (मीडिया) यांच्याशी निगडित खूप संधी आज आहेत. नजीकच्या काळात त्या अजून खूप संधी उपलब्ध होतील असं दिसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘सोशल मीडिया अनॅलिसिस’. त्यावरून होणारं मानवी भावनांचं विश्लेषण जाहिरात क्षेत्रातील कंपन्यांना, राजकीय पक्षांना निवडणूक धोरण ठरवताना फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे भविष्यात अशा संधी खूप असणार आहेत. फक्त आता त्या दिशेने पुढे जायला हवं.
** ‘आयटीमध्ये जॉब लगेच मिळतात’ असा विचार करून वेगवेगळ्या शाखांमधील इंजिनिअर्स कामासाठी हे क्षेत्र निवडतात. पण आयटीत नोकºया नाहीत, अशी चर्चाही सतत होते..
- या इंजिनिअर्सना मी सांगतो की असा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. कारणं दोन आहेत. एक म्हणजे, नजीकच्या काळात मेकॅनिकल, सिव्हिल यांसारख्या मूलभूत शाखांचं मार्केट विस्तारतंय. आतापर्यंत त्यातल्या त्यात बरी मुलं ही चांगल्या पगाराची पटकन मिळणारी नोकरी याचा विचार करून आपली मूळ शाखा सोडून आयटीमध्ये येत होती; अजूनही येत आहेतच. पण त्यामुळे मेकॅनिकल, सिव्हिल क्षेत्रात खºया अर्थाने चांगल्या लोकांची वानवा आहे आणि येणारा काळ बघता त्यांना लोकांची गरजही आहे. या शाखांशी निगडित मार्केटच्या विस्ताराचा वेग आयटीपेक्षा कमी आहे त्यामुळे अनेकांचा गैरसमज होतो. आता हळूहळू तोही वाढतोय. ‘विचार करा’ असं सांगण्यामागचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही ते काम करताना आनंदी असणार आहात का याचा विचार करा. मला वाटतं तो आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्याचा खूप प्रभाव तुम्ही करत असलेल्या कामावर, त्याच्या दर्जावर पडत असतोच.
** इंजिनिअर झाल्यावर अनेकजण म्हणतात, कामात मन रमत नाही, रुटीन, तेच ते काम असतं हे कोडं कसं सोडवायचं?
- आपण काम आवडतं म्हणून करण्यापेक्षा केवळ ते जमतं म्हणून स्वीकारतो. माझ्याच उदाहरणावरून मी सांगतो. मी आयआयटी केलं. नंतर आयबीएमसारख्या कंपनीमध्ये काम केलं. ते मला जमत नव्हतं का? तर नक्कीच जमत होतं. त्यामुळेच तर मी इतकी वर्षं तिथे टिकलो. पण मला शिकवायचं होतं. मला ते आवडतं. त्यामुळे मग मी नोकरी सोडली आणि आता मी मुलांना शिकवतो. माझं साधं म्हणणं आहे. रात्री आठला घरी गेल्यावर वाटलं पाहिजे की ‘वाह! आज मजा आली!’ नाहीतर ‘चला गेला एक दिवस एकदाचा’ असं रडगाणं नको.
** ‘भविष्यात जॉब्ज कसे असतील, विशेषत: आयटी क्षेत्रात याचा आज अंदाज बांधणंही शक्य नाही’ असं अनेक तज्ज्ञांचं मत येतंय. या गोष्टीकडे तुम्ही कशाप्रकारे बघता?
- आज उबर, ओला या चारचाकी सेवेचा प्रभाव आपण बघतोय. आतापर्यंत कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं की असा काही व्यवसाय निघेल, त्यात इतक्या वेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आज ते घडतंय. आता लोकं गाडी खरेदी करण्याआधीही विचार करतील. मला हवी तेव्हा जर गाडी चालकासकट मिळत असेल तर काय वाईट आहे? या सगळ्याचा विचार आपण केला नव्हता. कॅश आॅन डिलिव्हरीसारखी सुविधा, गुगल मॅप अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपण विचारही केला नव्हता त्या आज आहेत, त्यामुळे अनेकांना नोकºया आहेत. आज मार्कझुकेरबर्गच्या घरी स्वत:चा बॉट आहे जो त्याला घरकामात मदत करतो. पुढच्या काही वर्षांत तुमच्याकडेही काहीतरी असेल ज्यामुळे इस्त्री करणारा माणूस, घरकामासाठी येणारी बाई यांची तुम्हाला गरज लागणार नाही. ही कामं पुढच्या काळात राहणार नाहीत. सेवांचं स्वरूप बदलतं आहे..
** अशा माहीत नसलेल्या जॉब मार्केटसाठी स्वत:ला तयार करण्यासाठी तरुण मुलांनी काय करावं?
- उत्तर सोप्पं आहे. कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या पलीकडे जाऊन शिक्षण घ्यायला हवं. ज्ञान महत्त्वाचं. कॉलेज किंवा तुमचं महाविद्यालय नाही. कोर्सेस करा. आयटी क्षेत्रासाठी निरनिराळे आॅनलाइन कोर्सेस आज उपलब्ध आहेत. फ्री आहेत. फी असलीच तर ती काही फार नाही. जमतील आणि मुख्य म्हणजे आवडतील तितके आॅनलाइन कोर्सेस करा. भविष्यात तुमची गरज कुठेही पडू शकते. त्यातून तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळणार आहे. हे सर्व जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर करा. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर आपल्या शिक्षणव्यवस्थेतून काहीतरी होईल, मार्ग सापडेल याची अपेक्षा अजिबात ठेवू नका. आज शाळांमध्ये मुलांची कल चाचणी होत नाही. मुलांना काय आवडतं हे जाणून घेतलं जात नाही. सतत चर्चा होत असलेला हा सगळा विषय आहे. त्यात परत आपण नको शिरायला. मी म्हणेन की तक्र ार करणं बंद करा. ‘यू टेक चार्ज!’ तुमचं तुम्ही ठरवा आणि कामाला लागा.
** इंजिनिअर व्हायचं असं अनेकजण आणि त्यांचे पालक खूप आधीपासून ठरवतात, त्यांची तयारी आठवीपासून सुरू होते, जेईईची तयारी करतात.. कसं बघायला हवं या विषयाकडे?
- याचे दोन भाग आहेत. पहिला म्हणजे जेईईच्या परीक्षेचं स्वरूपच असं आहे की त्यासाठी अधिक काळ अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे अगदीच आठवी-नववी नाही पण दहावीपासून साधारण अंदाज घेऊन त्यादिशेने जाणं योग्य ठरेल. दुसरा मुद्दा म्हणजे आईवडिलांच्या इच्छेचा. ‘एकतर माझं चांगलं चाललंय त्यामुळे तू माझ्यासारखा हो; नाहीतर माझं स्वप्न पूर्ण झालं नाही आता तू ते पूर्ण कर’ या दोन विचारांमुळे अनेकदा पालकांच्या इच्छा लादल्या जातात. तंत्रज्ञान तुमच्या मुलाला आकर्षित करतं का? तुम्हाला उत्तेजित करतं का? हे पालकांनी ओळखणं आवश्यक आहे आणि हे नववी-दहावीमध्ये कळू शकतं. या पिढीने ‘आपल्याला खरंच काय हवंय’ हे जाणणं फार गरजेचं आहे.
** असाच गोंधळ अभियांत्रिकी शाखा कशी निवडायची याविषयीही आहे, त्याबद्दल काय सांगाल? मुळात ती निवडण्याची योग्य वेळ कोणती?
- योग्य वेळ निश्चितच अकरावी, बारावी. अभियांत्रिकी शिक्षणाविषयी बघायचं झालं तर एक ठरवून दिलेली कार्यपद्धती आणि त्यानुसार होणारं काम या गटात मेकॅनिकल, सिव्हिल या शाखा येतात. कम्प्युटर सायन्स हे तुलनेनं अधिक सर्जनशील आहे. त्यामुळे मूलभूत पण ठोस अशा कामाची आवड असेल तर बाकी शाखांचा विचार करावा. सततच्या बदलाची आवड असेल तर कम्प्युटर सायन्सचा विचार करू शकता. अर्थात हे अगदीच ढोबळ आहे आणि कुठल्या शाखेपेक्षा आधी तुम्हाला काय आवडतं हे बघणं गरजेचं.
** अनेकांना भीती वाटते, आपलं काही चुकलं तर?
आपल्या शिक्षणव्यवस्थेतून काय करू नका हेच शिकवलं जातं. त्यातून कसलीच नवनिर्मिती होत नाही. आम्ही नवीन काही करू शकतो ही ऊर्मी नाहीशी होते. चुका महत्त्वाच्या असतात. पेनसेल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये तर अभियांत्रिकी शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी 'Failure 101' नावाचा विशेष कोर्स आहे. ज्यात अधिक चुका करणाºया विद्यार्थ्यांना अधिक चांगली श्रेणी दिली जाते. विद्यार्थ्यांनी धोका पत्करून अधिक प्रयोगशील व्हावं हे त्यातून अपेक्षित आहे. स्वीडन, इस्राईल या देशांमध्ये होत असलेली प्रगती हे त्यांच्या अशाच प्रकारच्या शिक्षणव्यवस्थेचं यश आहे. आपल्याकडे व्यवस्थेतून किती बदल घडेल माहीत नाही; त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. लवकरात लवकर स्वत:ला जाणून घ्या आणि स्वत:चं करिअर घडवा, एवढंच मी सगळ्याच गटातल्या मुलांना सांगेन.
** एक चांगला इंजिनिअर बनण्यासाठी पाच गोष्टी करायला हव्यात :
1 पालकांनी टोकाच्या भूमिका घेऊन आपली मतं लादणं बंद करावं. कारण सुरवात तिथूनच होते.
2 व्यवसायाला संधी आहे का हे पाहण्यापेक्षा मला संधी आहे का हे पाहून निर्णय घेतला पाहिजे. थर्ड क्लास इंजिनिअर होण्यापेक्षा फर्स्ट क्लास कलाकार होण कधीही उत्तम हे पालकांनी आणि मुलांनी, दोघांनीही समजून घेतलं पाहिजे.

3 क्षेत्राला असलेला वाव, तुमची आवड, कौशल्य आणि क्षमता ह्यांची योग्य सांगड घालून निर्णय घ्यायला हवा.
4 भविष्याचा अंदाज घ्यायला शिकलं पाहिजे. अजून चार वर्षांनी, पाच वर्षांनी काय परिस्थिती असेल याचा विचार करून पुढचा निर्णय घेतला पाहिजे.
5 कोणावरही अवलंबून न राहता स्वत: योग्यवेळी निर्णय घेऊन त्यासाठी तयारी करायला हवी. आता आयटी क्षेत्राबद्दल सांगायचं झालं तर coursera, edX, codecademy वरून कोर्स करता येऊ शकतात. व्हर्च्युअल इंटर्नशीप सारखे पर्याय आहेत. topcoder, गूगल सारख्या कंपन्यांच्या निरिनराळ्या स्पर्धा आहेत. CloudCrowd सारखे आॅनलाइन काम करण्याचे पर्याय आहेत

Sunday, 30 July 2017


व्यवसायचं का करावा.
-------------------------------------------------

एका नामांकित कंपनीच्या बाहेर एक सुप्रसिध्द असे समोश्याचे दुकान होते. त्या कंपनीतील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी या दुकानात यायचे. व तेथील चटकदार, चवदार समोसे खायचे. त्या कंपनीमधील बऱ्यापैकी सर्वजण समोसावाल्याच्या ओळखीचे झाले होते.

एके दिवशी कंपनीच्या मॅनेजरला (व्यवस्थापकाला) समोसावाल्याची खिल्ली उडवण्याची लहर आली. मॅनेजरने विचारले, “मित्रा तू तुझे हे समोश्याचे दुकान खूप चांगल्या प्रकारे चालवत आहेस. पण तू तुझा अमूल्य वेळ व हुशारी समोसे तळण्यात वाया घालवत आहेस, असे तुला कधीच वाटत नाही का? जरा विचार करुन बघ, जर तू सुध्दा माझ्यासारखा एखाद्या कंपनीत काम करत असता तर कुठे पर्यंत प्रगती करु शकला असता? कदाचित तू देखील माझ्यासारखाच मॅनेजर झाला असता.”

या प्रश्नावर थोडासा विचार करुन शांतपणे हसत समोसावाल्याने उत्तर दिले, “साहेब माझे हे काम तुमच्यापेक्षा कैकपटीने चांगले आहे. १० वर्षापूर्वी मी डोक्यावर टोपली घेऊन दारोदार फिरुन समोसे विकायचो. तेव्हा तुम्ही प्रथम नोकरीला लागला असाल. १० वर्षापूर्वी मला समोसे विकून दरमहिन्याला एक हजार रुपये मिळायचे तेव्हा तुमचा पगार १० हजार रुपये होता. १० वर्षात दोघांनी खूप कष्ट केले, मेहनत घेतली. तुम्ही सुपरवायझर पासून मॅनेजर पदापर्यंत मजल मारली व मी टोपली घेऊन फिरणारे समोसावाला ते एक स्थिरस्थावर दुकानदार असा प्रवास केला. आज तुमचा पगार ५० हजार रुपये आहे. तर मी महिन्याला दोन लाख रुपये कमावतो.”

समोसावाला पुढे बोलू लागला, “फक्त एवढ्यावरुनच मी म्हणत नाही की माझे काम चांगले आहे. मला जास्त अंगमेहनत करावी लागते हे मान्य. आपण थोडा पुढचा विचार करु या. मी हे काम माझ्या पुढच्या पिढीसाठी करत आहे. मी या कामाची सुरवात अगदी कमी भांडवलात केली होती. उत्पन्न ही कमीच होते. मात्र माझ्या मुलांना हे करावं लागणार नाही. त्यांना मी उभा केलेले दुकान मिळेल. हा वाढलेला व्यवसाय ते पुढे अजून वाढवतील.”

मॅनेजर साहेब ऐकत होते, “याउलट तुमचा मुलगा direct तुमच्या पदावर जाऊ शकत नाही. त्याला परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल. व त्याच्या मेहनतीचा फायदा या कंपनीच्या मालकाच्या मुलांना होईल. तो आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्या एवढाच किंवा फार तर दोन पावले पुढे जाईल तर माझा मुलगा माझ्या फार पुढे निघून जाईल. तर साहेब आता सांगा, कुणाचा वेळ व हुशारी वाया जात आहे?” मॅनेजर साहेबांनी २ समोश्याचे २० रु दिले व निरुत्तर होऊन निघून गेले.

हा प्रसंग व्यवसाय का केला पाहिजे हे शिकवून जातो. तुम्ही तुमच्यानंतरही तुमचा वारसा केवळ मुलांनाच नाहीतर समाजाला, काम करणाऱ्या लोकांना व कितीतरी घटकांना होत असतो. एडिसनने १८९२ मध्ये सुरू केलेली जनरल इलेक्ट्रीक कंपनी आज एडिसन नंतर ही काम करत आहे. कोणतीही संकल्पना, विचार किंवा संस्था (मग तो व्यवसाय असो, सामाजिक संस्था असो की देश) ही तिला जन्म देणाऱ्या व्यक्तीहून फार मोठी असते. तिला जन्म देणाऱ्या मेंदूचा नाश झाला तरी ती वाढतच राहते. चिरकाल टिकते. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आपण तिची काळजी घ्यायची असते. एकदा ती स्वतःच्या ताकदीवर उभा राहिली की आपले काम पूर्ण होते.

Friday, 14 July 2017

टाइम पास---

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी लाभणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही

Saturday, 24 June 2017


महाराष्ट्राचे हेन्री फोर्ड, किर्लोस्कर उद्योग समुहाचे संस्थापक.

इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. बेळगावात प्लेगची साथ आल्याने दुकान शहरा बाहेर हलवावे लागले. मात्र परदेशी नागरिक भीतीने न आल्याने हा धंदाही बसला. नुसते सायकलवर अवलंबून राहण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनी आजूबाजूच्या परिसरावर लक्ष केंद्रित केले. त्यातून त्यांना शेतक-याची अडचण लक्षात आली. शेतकरी जनावरांना कोंडा घालत. त्यात धान्याची पाती व फांद्याचे तुकडे असत. जनावरे ते खात नसत. ते तुकडे तसेच बाहेर टाकत त्यामुळे जनावरांनाही त्रास होत असे. त्यामुळे लक्ष्मणरावांनी चा-याचे बारीक तुकडे करणारे यंत्र बनवले. त्यांनी ते मशीन खेड्यापाड्यात जाऊन चालवून दाखवले. लोकांना ते पसंत पडले. जनावरांचाही त्रास कमी झाला. मात्र गुरांसाठी पैसे खर्च करण्याची मानसिकता शेतक-यात नव्हती. कारण रानात चा-याचा तुटवडा नव्हता.

हा प्रयोग फेल झाल्यावर त्यांनी विचार केला की, शेतक-यांना आवश्यक असणारी वस्तू बनविली पाहिजे. त्याप्रमाणे त्यांचे लक्ष नांगरकडे वळले. पारंपरिक नांगर खोलवर शेत नांगरत नव्हते. त्यामुळे पिक चांगले जोम धरत नसायचे म्हणून त्यांनी अधिक लोखंड घालून मजबूत नांगर बनविला. मात्र नवा नांगर आपल्या जमिनीत घालावा ही मानसिकता शेतक-यांची नव्हती. मात्र लक्ष्मणरावांना नांगर चालेल असा विश्वास होता. अनेकांनी तो नांगर नाकारला. शेतकी खात्याने त्यांच्या नावाची शिफारस न करता त्यात चुका काढल्या. लक्ष्मणरावांनी ते आव्हान स्वीकारले त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. परदेशी नांगराचा अभ्यास करून आपल्या नांगरात सुधारणा केल्या. मात्र तरीही त्याची किंमत त्याकाळी ४० रु. होती. सामान्य नांगर ६ रु. ला पडत होता. ही मोठी अडचण होती. मात्र येणारे पिक जमा धरल्यास हा खर्च सहज परवडणारा होता. म्हणून किर्लोस्करांना विश्वास वाटत होता. त्यांच्या नांगराची माहिती मिळाल्यावर काही शेतकरी आले व त्यांनी मोठी ऑर्डर दिली. त्यातून त्यांना उत्साह वाढला. नांगर हळूहळू प्रसिद्ध होऊ लागले. यानंतर मात्र सरकारच्या शिफारसीत किर्लोस्कर नांगराचा समावेश झाला. अनेक व्यापा-यांनी ते खरेदी केले व इतर शेतक-यांना ते भाड्याने वापरण्यास दिले. अशाप्रकारे व्यवसाय वाढत गेला.

कारखाण्याच्या जमिनीचा प्रश्न निर्माण झाल्याने ती जागा जाणार होती. दरम्यान त्यांनी एका मित्राला औंध येथे सभागृह बांधकामात चांगले काम करून दिल्याबद्दल त्या मित्राने किर्लोस्कर यांना पडीक जमीन कारखान्यासाठी दिली. त्या जमिनीत साप विंचू फार होते. रेल्वे दूर अंतरावर होती. रस्तेही चांगले नव्हते. अन्य सुविधा नव्हत्या, मात्र ओंध येथील त्या पडीक जमिनीत त्यांनी कारखाना उभारण्याचे आव्हान स्वीकारले.
बेळगावहून रेल्वेने यंत्रसामग्री आणली. तेथून बैल गाडीतून ते सामान आणले व कारखाना सुरु केला. हा कारखाना एवढा वाढला की, ही जमीन म्हणजेच प्रसिद्ध उद्योग वसाहत किर्लोस्कर वाडी बनली. एक प्रसिद्ध उद्योग नगरी. शून्यातून आकाराला आलेल्या उद्योगाची कर्मभूमी.

येथे ३ वर्षे चांगला व्यवसाय केल्यावर १९१४ मध्ये युद्ध सुरु झाले. त्यामुळे परदेशी रंग, लोखंड मिळणे कठीण झाले. मात्र किर्लोस्कर यांनी तोडगा काढला. त्याकाळी कोल्हापुरात बिनकामाच्या तोफा पडून होत्या, त्या त्यांनी मिळविल्या आणि त्या वितळवून कच्चे लोखंड मिळवून नांगर तयार केले. त्याच दरम्यान जवळच भद्रावती येथे कच्च्या लोखंडाचा कारखाना सुरु झाला होता. त्यामुळे लोखंडाची गरज मिटली. कोळसा लाकडाच्य वखारीतून त्यांनी मिळविला. रंगाचा कारखाना स्वत:च सुरु केला.

या युद्धकाळात अनेक वस्तूंची मागणी वाढते व व्यापारी उद्योगपती तरले जातात. त्याप्रमाणे किर्लोस्कर उद्योगही तरला. १९१८ पर्यंत त्याचे भांडवल ५ लाख झाले होते. त्याकाळी ही रक्कम गडगंज होती. यानंतर मात्र किर्लोस्कर यांनी उद्योगात भरारी घेण्यास सुरुवात केली. १२ लाखाचे भांडवल उभे करून किर्लोस्कर ब्रदर्स लि. कंपनी स्थापन केली. तिची व्यवस्था पाहण्यासाठी किर्लोस्कर सन्स एन्ड कंपनी उभारण्यात आली. लोकाचा विश्वास् बसावा यासाठी कंपनी गुंतवणुक दारांना ९% डिव्हिडंड देणार नाही तोपर्यंत संचालक मोबदला घेणार नाहीत असे जाहीर केले. याचा चांगला परिणाम झाला. मोठे भांडवल उभे राहिले.

Monday, 19 June 2017


एक शिक्षक ते चीनचा सर्वात श्रीमंत माणूस - अचंबित करणारा प्रवास
----------------------------------------
सक्सेस स्टोरीज आपल्या सर्वाना आवडतात. हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या व्यक्तींच्या एकदम “लार्जर दॅन लाइफ” गोष्टी आपल्याला नेहमीच मोहात पाडतात. खरं तर अनेक उपदेशांपेक्षा या खऱ्याखुऱ्या सत्यकथाच आपल्याला जास्त प्रेरित करतात. मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशाच व्यक्तीबद्दल आणि त्याच्या स्वप्नवत वाटणाऱ्या यशोगाथेबद्दल सांगणार आहे.

मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा माणसाबद्दल ज्याने चीनसारख्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था आणि इंटरनेट उद्योगाची बाजारपेठ एकहाती बदलवून टाकली. त्याचे पूर्ण आयुष्य हे एखाद्या चित्रपटकथेला लाजवेल इतके थक्क करणारे आहे.

ही कथा आहे जॅक मा (Jack Ma) याची !!

जॅक मा हा अलिबाबा.कॉम (Alibaba.com) या जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीचा आणि अलीपे (Alipay) या ई-पेमेंट कंपनीचा संस्थापक आहे. सध्या तो अधिकृतरीत्या चीनमधील सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे. जॅक मा ची संपत्ती तब्बल २५०० करोड अमेरिकी डॉलर्स इतकी महाप्रचंड आहे. जॅक मा च्या अलिबाबा या कंपनीने २०१४ मध्ये अमेरिकेच्या शेअरमार्केट मध्ये प्रवेश केला आणि त्यात अमेरिकेच्या (आणि जगाच्या) इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक (तब्बल १५००० करोड अमेरिकी डॉलर्स) नोंदवण्यात आली. अलीबाबा या कंपनीचे केवळ 7.8% शेअर्स हाती असताना जॅक मा एवढा श्रीमंत आहे, याहून अधिक शेअर्स असते तर जॅक मा ची संपत्ती किती वाढली असती याचा विचार न केलेलाच बरा..

हे सर्व आकडे पाहून तुमच्या डोळ्यासमोर एखादया गर्विष्ठ आणि गर्भश्रीमंत माणसाचा चेहरा आला असेल ना... परंतु हीच खरी कथा आहे... जॅक मा हा एका गरीब घराण्यातून आलेला साधासुधा मनुष्य आहे. अलिबाबा.कॉम सुरु करण्याआधी जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून काम करत होता. पण शिक्षक म्हणून स्थिरावण्याच्या आधीही जॅकने बऱ्याच खचता खाल्या आहेत. इतक्या की ‘जॅक = अपयश’ हे एक समीकरणच बनून गेले होते.

जॅक चे खरे नाव आहे "मा युन". चीनमधील Hangzhou या प्रांतात मोठा भाऊ आणि धाकट्या बहिणीसोबत जॅक लहानाचा मोठा झाला. त्याचा जन्म १९६४ सालचा. आई-वडील जागोजागी संगीतातून कथाकथनाचे खेळ करायचे. घराची परिस्थिती मध्यमवर्गाहून थोडी कमी म्हणता येईल अशी. लहानपणापासून जॅकने नापास होण्याचा सपाटाच लावलेला. प्राथमिक शाळेत तो दोनदा नापास झाला. माध्यमिक शाळेत तीन वेळा नापास झाला. महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठीच्या पूर्वपरीक्षेत तीन वेळा नापास झाला तेव्हा कुठे त्याचा कॉलेजप्रवास सुरु झाला. हे झालं शिक्षणाचं !
पुढे नोकरीच्या बाबतीत तर जॅकने आणखीनच अपयश पाहिलं. तीन वर्षे प्रवेशासाठी वाट पाहिल्यानंतर तीन वर्षानी जॅकने पदवी प्राप्त केली खरी पण पहिली नोकरी मिळवण्याआधी जॅकला ३० वेळा नकार ऐकावा लागला. त्यापैकीच एक नकार होता जगप्रसिद्ध KFC चा. जेव्हा KFC चीन मध्ये नुकताच आली होती तेव्हा जॅक राहायचा त्या भागातील २४ जणांनी तेथे जॉबसाठी प्रयत्न केला होता. त्यापैकी जॅक वगळता इतर २३ जणांना नोकरी मिळाली होती. जॅकने पोलिसात भरती होण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली.

कॉलेजचे शिक्षण इंग्लिशमधून झाले असल्याने जॅकचे इंग्रजी थोडेफार बरे होते म्हणून त्याने काही दिवस "टुरीस्ट गाईड" म्हणून देखील काम केले. तेथेच त्याला एका परदेशी पर्यटक मुलीने जॅक हे नाव दिले. पुढे होता होता जॅक एक इंग्लिश शिक्षक म्हणून स्थिरावला. आणि त्यानंतर जॅकच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणारी एक गोष्ट झाली. १९९५ मध्ये चीन सरकारच्या एका उपक्रमाअंतर्गत जॅकला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याचे वय होते अवघे ३१ वर्षे.

अमेरिकेमध्ये जॅकचा कम्प्युटर्स आणि इंटरनेटशी पहिल्यांदा संबंध आला. तेव्हा चीन मध्ये कम्प्युटर्स अतिशय दुर्मिळ होते. इंटरनेट आणि इमेल्स तर जवळजवळ अस्तित्वातच नव्हत्या. नेटवर त्याने चायना असं सर्च केल्यावर त्याला काहीच माहिती मिळाली नाही. आपल्या देशातही हे असावं असं जॅकला वाटू लागलं. त्याने तसं वेडच घेतलं. हे स्वप्न घेऊन जॅक मायदेशी परतला.

सर्वप्रथम काही मित्रांकडून पैसे घेऊन त्याने व्यवसायाला सुरुवात केली. प्रोग्रामिंगचे अजिबात ज्ञान नसताना, व्यवसायाचा आणि विक्रीचा काहीही अनुभव पाठीशी नसतांना आणि मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणारा पुरेसा ग्राहकवर्ग नसतानाही जॅकने अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी सुरु केली. ऑनलाईन खरेदी करणे हे सोयीचे आणि सुरक्षित आहे हे ग्राहकाना पटवून देण्यात अलिबाबाने बराच वेळ खर्ची घातला. पण हळूहळू जॅकला यश येऊ लागले. पुढे जसजसा इंटरनेटचा प्रसार वाढत गेला तसा अलिबाबाचा पसारा देखील वाढत गेला आणि बघता बघता अलिबाबा.कॉम ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.


Wednesday, 31 May 2017

प्रेम
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं
शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं 
__कुसुमाग्रज